मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवारांचा शिलेदार या मतदारसंघात मुंडेंना टक्कर देऊन बाजी मारणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातून (Ajit Pawar NCP Group) बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. प्रवेशानंतर राष्ट्रवादीने बीडमधून त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छुक होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडसाठी पसंती दिली. त्यामुळे बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत होणार आहे .
बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात. आता सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने धनंजय मुंडे आणि सोनवणे यांच्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी सातारा आणि माढ्यामधून पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या दोन जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.