मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघआतून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता त्यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न शिंदेंच्या शिवसेनेला पडलेला आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेते. गजानन कीर्तिकर शिंदेंच्या शिवसेनेत आले, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंसोबत राहिलेत. या मतदारसंघात पिता विरुद्ध पुत्र अशी लढत होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र निवडणूक लढणार नाही असं कीर्तिकरांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर या मतदारसंघात शोधाशोध सुरु झालेली आहे..
वायकर शिंदे सेनेत मात्र उमेदवाराची वानवा
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय आणि जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र अद्यापही कीर्तिकरांसमोर उभा ठाकू शकेल असा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेला दिसत नाहीये.
गोविंदाचा पक्षप्रवेश मात्र विरोध कायम
अभिनेता गोविंदानं नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळं गोविंदाला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र लोकसभा मतदारसंघात गोविंदाला विरोध होतोय. २००४ च्या निवडणुकीत उ. मुंबईतून गोविंदानं राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर गोविंदा मतदारसंघात फिरकलाही नव्हता. त्यामुळं गोविंदाला तिकिट देण्यास स्थानिक पदाधिकारी विरोध करताना दिसतायेत.
निरुपम शिंदेंच्या शिवसेनेत येणार?
या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा होता. संजय निरुपम या मतदारसंघाकडून इच्छुक आहेत. मविआत या जागेबाबत चर्चा सुरु असतानाच, सांगली आणि उत्तर पश्चिमच्या उमेदवाराची घोषणा ठाकरेंकडून परस्पर करण्यात आली. यामुळं काँग्रेस नेतृत्व नाराज आहे. त्यानंतर आता काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. निरुपम यांनी पक्षाला एका आठवड्याची मुदत दिलेली आहे. त्यानंतर कदाचित ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःनेत्यांची झोप उडाली, या 3 जागांवर शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीची खलबतं