मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटें (Jyoti Mete) या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या . पण आता या निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत अशी भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत घेतली आहे . त्यामुळे आता ज्योती मेटेंच्या उमेदवारी अर्ज न भरण्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना होईल, असे दिसून येत आहे .
या बीड मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde )विरुद्ध बजरंग सोनवणे (bajrang Sonvane) अशी थेट लढत आहे. ज्योती मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. यासाठी, त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही दोनवेळा भेट ही घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार( Sharad Pawar group) गटाकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा जिल्हाभर सुरु झाली. यात ज्योती मेटे देखील शरद पवार गटातून लढण्यास इच्छुक होत्या. मात्र यामध्ये ज्योती मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसातच शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली त्यानंतर आता त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे . सर्व जनतेची इच्छा निवडणूक लढावी अशी आहे, मात्र काही गोष्टींचा विचार करून मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याच ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले. मात्र यानंतर त्यांची काय भूमिका असणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .
दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय प्रदेश पातळीवर बैठक घेऊन ठरवणार असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं. त्यामुळे, ज्योती मेटे बीड लोकसभेत उमेदवार नाहीत हे निश्चित झालं असलं तरीही त्यांच्या संघटनेचा पाठिंबा कोणाला असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.