मुंबई – महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं मानण्यात येतंय. भाजपानं याआधीच २४ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. अजून चार जागा भाजपा लढणार असं सांगण्यात येतंय. त्यानमुळं भाजपाच्या कमळ चिन्हावर एकूण २८ उमेदवार रिंगमात असणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेनं यापूर्वी आठ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. त्यात आणखी चार ते पाच जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं तीन उमेदवार जाहीर केले आहेत, त्यांना अजून दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा भाजपाकडे?
भाजपानं २४ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. त्यात अजून उत्तर मध्य मुंबईच्या जागेची घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांनी लढावं असा भाजपा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. तर साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाच्या कमळ चिन्वाहरच रिंगणात उतरायचं असल्यानं हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं आहे. यावर येत्या एक दोन दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ाहे.
ठाणे, संभाजीनगर शिंदेंच्या शिवसेनेकडे
ठाणे, पालघर आणि कल्याणमधील एक मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आलेली होती. त्यात ठाण्यासाठी भाजपाचा विशेष आग्रह होता. मात्र ठाणे मतदारसंघातून धनुष्यबाणावरच उमेदवार दिला जाणार आहे. रवींद्र फाटक किंवा भाजपाचे संजीव नाईक या मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
नाशिक, धाराशिव अजित पवारांकडे
अजित पवारांनी शिरुर, बारामती आणि रायगड या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा केलेली आहे. आता त्यात नाशिकमधून छगन भुजबळ घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर धाराशिव हा शिवसेनेचा मतदारसंघही अजित पवारांकडे जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. तिढा असलेल्या सगळ्याच जागांवर बोलणी यशस्वी झाल्याचं सांगण्यात येतंय.