मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . अशातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे .या निवडणुकीनंतर महाराष्ट्र्रात सत्तातर होणार असून सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याचा शब्द दिला असून लोकसभेनंतर ही सर्व मंडळी शरद पवार गटात येतील, असा दावा त्यांनी केला आहे . त्यामुळे महायुतीत लवकरच भूकंप होणार असलयाचे दिसत आहे .
या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० पैकी ७ जागांवर नक्कीच विजय होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर निवडणुकीनंतर महायुतीमधील १० ते १२ बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (Sharad Pawar Party )येतील. या नेत्यांचा माझ्यासोबत करार झाला आहे. असा मोठा दावाही जयंत पाटील यांनी केला. हे नेमके कोण आहेत याचा तपशील सांगून मी त्यांना अडचणीत आणणार नाही? थोडे दिवस जाऊ दे असे सांगत दिल्लीत सत्तांतर होणार आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असे ते म्हणाले आहेत . येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किमान ६० आमदार निवडून येतील, असा आमचा प्रयत्न असल्याचंही जयंत पाटील म्हणाले आहेत .त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चना उधाण आलं आहे .
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सांगली मतदारसंघावरून ठाकरे आणि काँग्रेस मध्ये जोरदार वाद सुरु आहे . या मतदारसंघात ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे . यावरून बोलताना या जागेची चर्चा ही शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात असून यात राष्ट्रवादीचा कोणताही रोल नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत . भाजप नेते आशिष शेलार यांनी काल बोलताना गडबडीत सुनेत्रा पवार पराभूत होतील असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना त्यांनी अजितदादांना टोला लगावला आहे . ते म्हणाले , त्यांची स्लिप ऑफ टंग नाही तर शेलार यांची तशी अंतर्गत माहित असेल, त्यामुळे ते चुकून बोलले नसतील . अजितदादा तिकडे गेलेत, त्यामुळे त्यांचे तिथे कोणकोण हितशत्रू आहेत याचा अनुभव त्यांना आता येत असेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे