मुंबई: मुंबईसह राज्यातील सर्वच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढण्यावर अखेर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray’s alliance) एकमत झाले आहे. अनेक दिवसांच्या राजकीय चर्चेनंतर, “घोडे गंगेत न्हाले” अशी स्थिती निर्माण झाली असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी १२ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात करण्यात येणार आहे.
या घोषणावेळी उद्धव ठाकरे (Udahav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून ठाकरे बंधूंच्या युतीचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. मात्र या युतीसोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC elections) ‘पवार’ घटक कोणता असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मतमोजणीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका महायुतीच्या (Mahayuti) माध्यमातूनच लढाव्यात, यासाठी अजित पवार, त्यांचे मंत्री, आमदार आणि वरिष्ठ नेते आग्रही आहेत. विशेषतः मुंबई महापालिका महायुती म्हणून लढवावी, यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
मात्र अजित पवार यांनी मुंबईतील सर्वस्वी जबाबदारी माजी आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे दिल्यामुळे मुंबई भाजपमध्ये (Mumbai BJP) तीव्र नाराजी आहे. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मंत्री आशिष शेलार (Minsister Ashish Shelar) आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम (MLA Amit Satam) यांनी नवाब मलिक यांच्या नावालाच तीव्र आक्षेप घेतला असून, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे अजित पवारांची कोंडी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी पुण्यात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत, “जर भाजप नेते नवाब मलिक यांच्या कारणावरून आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर थेट दोन्ही ठाकरे बंधूंशी युती करावी,” अशी रणनीती ठरल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.
दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) हे सुरुवातीपासूनच ठाकरे बंधूंनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून मुंबई महापालिका निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही होते. मात्र राज्यातील सध्याचे काँग्रेस (Congress) नेतृत्व आणि काही नेते यास तयार नसल्याने ही भूमिका अडचणीत आली आहे. त्यामुळे आता शरद पवार स्वतःही ठाकरे बंधूंशी युतीच्या पर्यायाकडे सकारात्मकपणे पाहत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

