मुंबई- अमित शाहा यांच्यासोबत मातोश्रीवर बंद खोलीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण झालं नाही म्हणून युती सोडून महाविकास आघाडीत गेल्याचं उद्अधव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं. याला अशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती. उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, असं प्रत्युत्तरही भाजपाकडून अमित शाहा ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी नवा गौप्यस्फोट करत, मुख्यमंत्रीपदाचा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे.
काय आहे उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नवं विधान केलं आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करुन दिल्लीला जाणार आहोत, असं फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, असा दावा ठाकरेंनी केलाय.
ठाकरे म्हणालेत की, मी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं वचन दिलं होतं. शिवसेना आणि भाजपाचा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असेल यावर अमित शाहा यांच्या चर्चेत एकमत झालं होतं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून दिल्लीत जाईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
फडणवीसांचं काय प्रत्युत्तर ?
याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आधी अमित शाहा यांच्याशी चर्चा झाल्याचं खोटं सांगितलं, आता आपल्याशी काय बोलणं झालं, हे खोटारडेपणे सागंतायेत. यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखे उद्धव ठाकरे नाहीत, त्यांचा आदर करु शकत नाही, असं फडणवीस म्हणालेत.
फडणवीस यांनी याबाबत एक्स पोस्ट केली आहे.
फडणवीसांची एक्स पोस्ट
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू.
पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही.
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत.
दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?
महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका.
जशास तसे उत्तर दिले जाईल !
ठाकरे-फडणवीस संघर्ष वाढणार
लोकसभा निवडणुकींच्या उर्वरित टप्प्यात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःसंभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, खैरे-भुमरे की जलील यांना संधी?