मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . महायुतीकडूनही (MahaYuti )प्रचाराची तयारी चालू झाली असून लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे (Sunil Baburao Mendhe) यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची गोंदियात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती .पण तडकाफडकी ही सभा रद्द करण्यात आली आहे . त्यामुळे ही सभा अचानक रद्द का केली या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे . या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली होती. दरम्यान आता अमित शाह यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .
लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने बैठका आणि दौरे सुरु असल्यामुळे कदाचित अमित शाह यांना थकवा जाणवत आहे . त्यांची ही रद्द झालेली सभा आता पुढच्या आठवड्यात 12 किंवा 13 एप्रिलला राहणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी ते उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला . असं असलं तरी विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा होणार आहे. येत्या 8 एप्रिलला ते चंद्रपूरच्या दौऱ्यावर येणार असून त्यांची तेथे जाहीर सभा होणार आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी येत्या 8 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची मोरवा येथे सायंकाळी 4 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त होती. मात्र, येथे पोटनिवडणूक लागली नाही.या ठिकाणी आता सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे .