मुंबई– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सभा पार पडल्यानंतर अमित शाहा मुंबईत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु होती.
जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?
महायुतीत लोकसभेच्या ४८ जागांवरुन तिढा निर्माण झालेला आहे. भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची अ्सल्यानं जास्तीत जास्त जागा भाजपाला मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरुयेत. त्यात भाजपा ३२ जागा लढेल असं सांगण्यात येतंयं. तर शिंदेंच्या शिवसेनेनं २२ जागांची मागणी केली आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीनंही १० ते १२ जागा मागितल्याची माहिती आहे. यावर अमित शाहा यांच्यासोबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शाहांनी नेमकं काय सांगितलंय?
लोकसभा निवडणुकीत हट्ट न करता, व्यवहार्य तोडगा काढा, असा सल्ला बैठकीत अमित शाहा यांनी दिल्याचं सांगण्यात येतंयं. ज्या पक्षाचा खासदार त्याला उमेदवारी, हे न करता, जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हा निकष असायला हवा, असं मत शाहा यांनी मांडल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यात दोन ते तीन मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. अमित शाहा आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत, त्यापूर्वी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. वादग्रस्त जागांवर सामंजस्यानी तोडगा काढण्यासही सांगण्यात आलेलं आहे.
विधानसभेत जास्त जागांचं मित्रपक्षांना आश्वासन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अमित शाहा यांची दोन ते तीन तास बैठक चाचली. यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेसाठी आग्रही असणाऱ्या मित्रपक्षांना विधानसभेत जास्त जागांचं आश्वासन द्या, मात्र लोकसभेला भाजपा आणि महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून यायला हवेत, असं अ्मित शाहा यांनी सांगितल्याची माहिती आहे.
आज किंवा उद्या भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
आज संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होतेय. पहिल्या बैठकीनंतर १९५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आजच्या बैठकीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार या राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार अ्सल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर आज किंवा उद्यापर्यंत राज्यातील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार? अमित शाहांच्या संकेतानंतर काय आहे राजकीय प्रतिक्रिया?