X: @therajkaran
भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून मोदी सरकारने खूप मोठी उपलब्धता मिळविली आहे. यापूर्वी राम मंदिर तसेच कलम ३७० हटवून भाजपने एक वेगळाच चमत्कार करून दाखविला. यामुळे देशात भाजप अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेले हे काम तरुणांना तसेच भाजप धार्जिण्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरत आहे. भाजपच्या या शक्तिशाली निर्णयांमुळे काँग्रेस पक्षाला अगोदरच घाम फुटला आहे. या कामाची पावती भाजपला मिळण्यासारखी असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला अधिक बळकटी मिळत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अगोदर भारत जोडो यात्रा काढली होती. त्यानंतर आता भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर पोहोचली आहे. यापूर्वी देखील त्यांनी जेव्हा यात्रा काढली होती त्यावेळी काँग्रेस पक्ष वाढण्याऐवजी कमी होत गेला, त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाला चांगलेच झटके बसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. ते काम भाजपच्या विकासात्मक दृष्टीने होत आहे. राहुल गांधी हे संपूर्ण देशभर यात्रा काढत असले तरी त्या यात्रेचा कितपत फायदा काँग्रेसला होत आहे? हे संपूर्ण भारतातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील यात्रेचा प्रवास नंदुरबार -धुळे- जळगाव -नाशिक- पालघरमार्गे मुंबई असा आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसमधील कोणते दिग्गज नेते या यात्रेचे मनातून स्वागत करत आहेत, हे कोणालाच माहीत नाही. परंतु ज्याप्रमाणे लोकसभेच्या तोंडावर अनेकांनी काँग्रेस सोडली तीच परिस्थिती विधानसभेच्या तोंडावरही नक्कीच दिसून येणार आहे.
मराठवाड्याच्या बाबतीत बोलावयाचे झाले तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याने मराठवाड्यात काँग्रेस विकलांग झाली आहे. पूर्वी मराठवाड्यात अशोक चव्हाण म्हणजेच काँग्रेस व काँग्रेस म्हणजेच अशोक चव्हाण असे चित्र होते. परंतु आता बदलत्या परिस्थितीनुसार काँग्रेस मराठवाड्यात विकलांग झाल्यात जमा आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर मराठवाड्याच्या बाबतीत दिल्ली स्थित पक्ष नेत्यांकडून वेगळीच जबाबदारी होती. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळे अशोक चव्हाण यांचे दिल्लीत वेगळे स्थान होते. त्यामुळे मराठवाड्यात राजकारण करत असताना त्यांना दिल्लीतील नेत्यांचा वेगळा आशीर्वाद होता. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यात काँग्रेस पक्षासाठी बलशाली नेता निर्माण होऊ दिला नाही. तसेच काँग्रेस पक्षालाही मराठवाड्यात त्यांच्या तोडीचा नेता निर्माण करता आला नाही. त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मराठवाड्यात तोंडावर आपटण्याची वेळ आली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात तरी कोणालाही पक्षांतर्गत मोठे होऊ दिले नाही. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक लढवत असताना भाजप उमेदवाराला कशाप्रकारे तोंड देऊ शकेल हे येणारा काळच ठरवणार आहे.
अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष देखील अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यावी, यावरूनच बैठका घेत आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसची वोट बँक असलेली दलित समाजाची तसेच मुस्लिमांची मते भाजपच्या पारड्यात कशी येतील? हा सर्वात मोठा प्रश्न होता. नांदेडमधून मुस्लिम समाजाने अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशोक चव्हाण यांच्या पाठीशी राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत मुंबई गाठली. त्या पाठोपाठ दलित समाजातील मतदारांनीदेखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाला बऱ्यापैकी विरोध दर्शविला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाला किती फायदा होईल याचे गणित आज तरी लावता येणार नाही. परंतु काँग्रेस पक्षाचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे हे अलीकडच्या राजकीय हालचालीवरून दिसून येत आहे. केवळ लोकसभा निवडणुकीपुरते हे राजकीय चित्र राहणार नसून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका सहन करावा लागणार आहे. तसे पाहिले तर अशोक चव्हाण अनुभवी तसेच चतुरस्त्र नेते म्हणून काँग्रेस पक्षात ओळखले जायचे. विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची व कोण आपल्यापुढे जाणार नाही याचे तारतम्य बाळगूनच अशोक चव्हाण हे विधानसभेसाठी उमेदवार निवडत असत. परंतु भाजपने देशभरात केलेल्या विकास कामांमुळे तसेच यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्यामुळे भाजपला नक्कीच अच्छे दिन येणार आहेत. हे राजकीय गणित हेरून अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पलटी मारत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात उमेदवार उभे करताना जशा अडचणी आल्या, तशाच अडचणी विधानसभेच्या बाबतीत येऊ शकतात. काँग्रेस पक्षात असताना अशोक चव्हाण यांनी ज्यांना दाबून कानाच्या खाली ठेवले होते, ते सर्व बिळात लपलेले व इकडे तिकडे पसरलेले काँग्रेसमधीलच पुढारी आता हळूहळू पुढे येत आहेत. तसेच यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या राजकीय दाबादाबीला जे कंटाळले होते, त्यांनी तेव्हाच काँग्रेस पक्ष सोडून अन्यत्र घरोबा केला होता. या सर्व राजकीय उलथापालथीमुळे मराठवाड्यात सध्या तरी वेगळेच चित्र निर्माण झाले आहे.
मराठवाड्यातील या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मात्र बुद्धिवादी मतदार संभ्रमावस्थेत आहे. जनता देखील कोणत्या राजकीय पक्षावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित करत आहे. मराठवाडा १९४८ मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी पी. व्ही. नरसिंहराव तसेच शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केले होते. तेव्हापासून चव्हाण कुटुंबीय काँग्रेसमध्ये कार्यरत होते. परंतु नंतर शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी पक्ष काढून इंदिरा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. १९८० मध्ये शंकराव चव्हाण यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. परंतु अलीकडे जेव्हा अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्यानंतर आणखी कोण कधी काँग्रेस सोडेल याचा नेम नाही. उद्याला कदाचित काँग्रेसमधून निवडून आलेले खासदार किंवा आमदारही त्यांच्यासोबत भाजपमध्ये येतील याचा नेम नाही. भाजपमधून उमेदवारी मिळणे अवघड असल्यामुळे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवा. जिंकला तर माझ्या पाठीशी या अशी गुप्त खलबते अशोक चव्हाण व काँग्रेस नेत्यांमध्ये झाली असावी, अशी चर्चा मराठवाड्यात होत आहे.
(लेखक डॉ अभयकुमार दांडगे he नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)