मुंबई – राज्यातील सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघात दोन राजांनी घेतलेल्या भूमिकेमुळं वाद निर्माण झालेला आहे. माढा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाीक निंबाळकर यांना रामराजे निंबाळकर यांनी जाहीर विरोध केलेला आहे. अजित पवार-फडणवीस यांनी केलेल्या शिष्ठाईच्या प्रयत्नांनंरही रामराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यातून भाजपाचं तिकीट मिळावं या मागणीसाठी उदयनराजे भोसले हे नवी दिल्लीत ठआण मांडून बसलेले आहेत.
माढ्यात नेमकं काय होणार?
भाजपाच्या राज्याच्या उमेदवार यादीत माढ्याची उमेदवारी विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आलीय. याला महायुतीतील अजित पवारांसोबोत असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केलाय. रणजीतसिंह आणि रामराजे निंबाळकर हे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. ही जागा अजित पवारांच्या राषट्रवादीतून रामराजेंचे बंधू संजीवराजे यांना मिळावी, अशी रामराजेंची मागणी होती. दुसरीकडं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रचाराला सुरुवात केलीय.
रामराजेंची समंजूत काढण्य़ाचा फडणवीस आणि अ्जित पवारांचा प्रयत्न असफल झाल्याचं दिसतंय. फलटणमध्ये काल घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढ्याचा उमेदवार बदलावा, अशी मागणी रामराजे निंबाळकर यांनी केलीय, उमेदवार तोच ठेवायचा असेल तर रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी माफी मागावी, अशी अटही त्यांनी ठेवलीय. हे जर घडलं नाही आणि नंतर रणजीतसिंहांना मतदान कमी झालं तर त्याची जबाबदारी आपली असणार नाही असंही रामराजेंनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे रणजीतसिंह यांनीही निवडून येण्यासाठी भाजपाची यंत्रणा मजबूत असल्याचं सांगत रामराजेंच्या सहकार्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलंय. आता हा तिढा सुटणार कसा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
साताऱ्यात उदयनराजे भाजपा उमेदवारीसाठी आग्रही
भाजप राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत असून आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदार संघ भाजपला सुटावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
सातारा मतदार संघात भाजपची ताकद चांगली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे केवळ एकच आमदार असल्यानं ही जागा आपल्याला मिळावी असा उदयनराजे यांचा आग्रह आहे. साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दुसरी जागा दिली जावी अशी उदयनराजे यांची भूमिका आहे.
उदयनराजे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिलाय. मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतलेली आहे.
अमित शाह यांच्या भेटीने सातारा-माढाचा तिढा सुटणार ?
सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघांचा विचार केल्यास, दोन्ही जागांची अदलाबदल महायुतीत केली तर तिढा सुटण्याची शक्यता आहे. माढाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्यास रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील पाटील यांची बंडखोरी होणार नाही. तर साताऱ्याची जागा भाजपाला मिळाल्यास उदयनराजेंचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. जाहीर उमेदवार पुन्हा बदलणार नाही, अशी भूमिका भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं सांगण्यात येतंय. आता या दोन राजांच्या आग्रहात महायुती काय तोडगा काढणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.