मुंबई – महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असतानाच काँग्रेसनं गुरुवारी रात्री राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोलापुरातून प्रणिती शिंदे, नांदेडातून वसंतराव चव्हाण तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आता उर्वरित उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीय, त्यावर त्यांनी टीका केलीय, तसचं भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पक्षानं सांगतिलं तर लोकसभा लढवणार असल्याचे संकेतही दिले आहेत.
सांगलीचा तिढा कायम
उद्धव ठाकरे गुरुवारी सांगली दौऱ्य़ावर होते, या दौऱ्यात झालेल्या सभेत त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे. सांगलीवर काँग्रसेचा दावा आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी या मतदारसंघातून काँग्रेस नेते आग्रही आहेत. यावर नाना पटोलेंना विचारणा केली असता, याबाबत चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय. आघाडीत वाटाघाटी सुरु असताना उमेदवारी जाहीर करणं अयोग्य असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
चंद्रपुरातून कोण लढणार?
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा कोण उमेदवार असेल, याची स्पष्टता आज येईल. असंही पटोलेंनी सांगितलेलं आहे. चंद्रपुरातून दोन नावं चर्चेत आहेत. यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची चर्चा होती. शिवानी वडेट्टीवार की विजय वडेट्टीवार याबाबत हायकमांड निर्णय करेल. असंही पटोलेंनी स्पष्ट केलेलं आहे. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार हे भाजपाकडून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर कोणता उमेदवार दिला जाईल, याकडं राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
भंडाऱ्यातून पटोले रिंगणात?
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर भंडारा – गोंदियातून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे. अन्यथा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू, असंही पटोलेंनी स्पष्ट केलेलं आहे. प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केलेला आहे. सोलापुरात भाजपच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळं घाबरुन भाजपानं हा भ्याड हल्ला केल्याची टीकाही त्यांनी केलीय. .
हेही वाचाःकेजरीवाल यांची अटक चूक, जनता आपच्या पारड्यात कौल टाकेल, काय म्हणालेत शरद पवार?