मुंबई- मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागलेले आहेत. इंडिया आघाडीतील सगळ्याच प्रमुख पक्षांनी या अटकेचा निषेध केलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत, मोदी सरकार आणि लोकसभा निवडणुकांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
केजरीवाल यांच्या अटकेचा भाजपाला फटका बसेल- पवार
देशातल्या प्रमुख नेत्यांवर कारवाई केली जातेय, हे चिंताजनक असल्याचं शरद पवार म्हणालेत. प्रत्येक राज्यात मद्य धोरण असतं, हे धोरण राज्य मंत्रीमंडळावर असतं. केजरीवाल यांना अटक करणं चुकीचं आहे, असं शरद पवार म्हणालेत. या निवडणुका मोकळ्या वातावरणात होतील का, अशी चिंता असल्याचंही पवार म्हणालेत. केजरीवाल यांना अटक झाली असली तरी जनता त्यांच्यासबोतच राहील, लोकसभा निवडणुकीत त्यांच्या १०० पेक्षा जास्त जागा येतील, असा दावाही पवारांनी केलाय. जनता केजरीवाल यांच्या बाजूनं कौल देईल, असंही पवारांनी स्पष्ट केलंय.
लोकशाहीवर आलेलं संकट
हे लोकशाहीवर आलेलं संकट आहे, असंही शरद पवार म्हणालेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू झालं आहे, असं पवार म्हणालेत. इंडिया म्हणून सर्व पक्ष केजरीवाल यांच्या पाठीशी आहेत. भाजपाला याची किंमत मोजावी लागेल, असंही पवार म्हणालेत. मोदींच्या भूमिकेला विरोध करण्याची ताकद केजरीवाल यांच्यात आहे
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
आत्तापर्यंत या देशात काही अपवाद सोडले तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणात पार पडलेल्या आहेत. मोदी सरकार सत्तेत असताना, यावेळेची निवडणूक कशी होईल याची शंका असल्याचं शरद पवार म्हणालेत. केंद्रीय यंत्रणांचा देशात गैरवापर होत असल्याची टीकाही पवारांनी केलीय. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात येत असल्याचंही पवार म्हणालेत. काँग्रेसचं खातं गोठवलेलं आहे, त्यामुळं त्यांची प्रचार यंत्रणा थांबल्या आहेत. प्रचाराची सामग्री सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही, अशा प्रकारे त्रास देण्यात येतोय.