मुंबई- मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचं दिसत असतानाच वंचित मविआसोबत जाणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआतील तिढा सुटला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च म्हणजेच मंगळवारी मविआनं प्रकाश आंबेडकरांना चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सात जागांवर वंचित अडून बसल्याचं सांगण्यात येतंय. महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी या जागांवरुन अद्यापही वाद सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. अशात वंचित काय निर्णय घेणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
जरांगे पाटील यांची आंबेडकरांनी घेतली भेट
मंगळवारी रात्री उशिरा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाऊन भेट घेतली. आंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा संघटना आणि वंचितनं एकत्र उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याचं आंबेडकरांनी बैठकीनंतर सांगितलेलं आहे. तर जरांगे पाटील यांनी याबाबतचा निर्णय ३० तारखेला मराठा समाजाच्या बैठकीत घेतला जाईल असं सांगितलेलं आहे.
वंचित तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात
मविआकडून सन्मानपूर्वक बोलणी झाली नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळं यापूर्वीच ठाकरे आणि पवारांना वगळून काँग्रेसशी चर्चेचा प्रस्ताव आंबेडकरांनी दिला होता. तसचं महाराष्ट्रातील कोणत्याही सात जागांवर काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं पत्रही त्यांनी मल्लिकार्जुन खर्गेंना पाठवलं होतं. मात्र आंबेडकरांच्या या पत्राला काँग्रेसनं अद्याप उत्तर दिलेलं नाही. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींच्या उमेदवारीला आंबेडकरांनी बिनशर्त पाठिंबा जाहबीर केलेला आहे.
अशात वंचित मविआसोबत जाण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतंय. वंचित स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरेल किंवा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा आंदोलक, शेंडगे आणि डावे पक्ष अ्शी आघाडी निर्माण करुन उमेदवार देण्याची शक्यता आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमनं ८ टक्क्यांपर्यंत मतं राज्यात घेतली होती. याहीवेळी हाच प्रयोग झाला तर त्याचा फटका मविआला बसण्य़ाची शक्यता आहे.
हेही वाचाःठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेची यादी जाहीर, 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला कुठं संधी?