मुंबई- महायुतीत अद्यापही नऊ जागांवर तिढा असल्याची कबुली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. भाजपाच्या केंद््रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होते आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल आणि हा तिढा लवकर संपेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे.
महायुतीत कोणत्या जागांवर तिढा?
- दक्षिण मुंबई
- उत्तर पश्चिम मुंबई
- ठाणे
- नाशिक
- रांमटेक
- अमरावती
- सातारा
- धाराशिव
9.संभाजीनगर
या नऊ जागांवर महायुतीत पेच असल्याचं सांगण्यात येतंय.
अमरावती भाजपा लढवणार
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी वादात असलेल्या दोन जागांबाबत झालेला निर्णयही सांगितलेला आहे. रामटेक ही शिंदेंच्या शिवसेनेची जागा असल्यानं रामटेकची जागा त्यांना मिळेल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर अमरावती ही जागा भाजपा लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास शिंदेंची शिवसेना, बच्चू कडू आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांचाही विरोध असल्याची चर्चा आहे. राणा या लवकरच भाजपात प्रवेश करतील असंही सांगण्यात येतंय. मात्र त्यांच्या जात पडताळणीचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय त्यांच्याविरोधात गेल्यास ही जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता या जागी कुणाला संधी भाजपा देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
दक्षिण मुंबईचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर संभाजीनगर आणि नाशिक या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगीतलय.
यावेळी सात ते आठ टक्के मतांमध्ये वाढ होईल
राज्यात सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते, नेते यांनी चांगली तयारी केलेली आहे. प्रत्येक बूथवर 51 टक्के मतदान भाजपाला कसं होईल, याचं नियोजन करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांत झालेल्या फुटीमुळं यावेळी महायुतीचं मतदान हे सात ते आठ टक्क्यांनी वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे.