मुंबई – अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर, आता राम मंदिराचं निर्माण हा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. यातच ऐन लोकसभा प्रचाराच्या धामधुमीत आलेल्या रामनवमीमुळं राजकीय नेत्यांचे पाय राम मंदिरांकडे वळाल्याचं पाहायला मिळालंय. यात महायुती आणि महाविकास आघाडीची नेतेमंडळीही आघाडीवर असल्याचं दिसलं.
काळाराम मंदिरात राजकारण्यांची गर्दी
नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे, उमेदवारीची चर्चा असलेले छगन भुजबळ पोहचल्याचं पाहायला मिळालंय. इतकचं नाही तर मंत्री दीपक केसरकर यांनीही काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं. ते पुढं शिर्डीतल्या रामनवमीच्या सोहळ्यालाही उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतंय.
कोल्हापुरात शाहू छत्रपती राम जन्मासाठी महालक्ष्मी मंदिरात
मविआचे कोल्हापूरचे उुमेदवार शाहू छत्रपती हे अंबाबाई मंदिरात राम मंदिरात दर्शनाला दाखल झाले. छत्रपतींची राजधानी असलेल्या कोल्हापूरात रामनवमीची परंपरा जुनीच आहे. या सोहळ्याला शाहू महाराज शिवाय संयोगीताराजे छत्रपती उपस्थित राहिले.
धुळ्यात रामाची शोभायात्रा
रामनवमीच्या निमित्तानं धुळ्यात भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत रामाच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भामरे यांच्या हस्ते प्रभू रामाची आरतीही करण्यात आली.
कल्याण-डोंबिवलीतही नेत्यांच्या राम मंदिरांना भेटी
कल्याण लोकसभा मतदारसंघातही रामनवमीच्या निमित्तानं राजकीय नेत्यांची पावलं ही राम मंदिरांकडे वळताना पाहायला मिळाली. राम जन्मोत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहिलेले दिसले.
हेही वाचाःमोदींची हवा नाही, वादग्रस्त वक्तव्यानं नवनीत राणा अडचणीत, राणा दाम्पत्य थेट अडसुळांच्या घरी