मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे . राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या ११ मतदारसंघांत आज मतदान होत आहे . आज सकाळी सातपासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले आहे.त्यापैकी अनेक जागांवर नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत .महायुती आणि भाजपसाठी हा चौथा टप्पा महत्वाचा असणार आहे .याआधीच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या ११ जागांपैकी फक्त शिरूर मतदारसंघ सोडला तर सर्व ठिकाणी महायुती आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा मात्र काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महायुतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, संदीपान भुमरे, रक्षा खडसे, सुजय विखे आणि पकंजा मुंडे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत तर महाविकास आघाडीमध्ये अमोल कोल्हे, निलेश लंके आणि चंद्रकांत खैरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.सध्या महायुतीकडे ११ पैकी नऊ मतदारसंघ असून ते कायम राखण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे आहे . अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे . याआधीच्या पहिल्या तीन टप्प्यांत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून आपल्या अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे राहिले आहे .
दरम्यान आज सकाळपासून या ११ मतदारसंघात झालेले मतदान -जळगाव – 6.14 टक्के , जालना – 6.88 टक्के ,नंदुरबार – 8.43 टक्के,शिरूर- 4.97 टक्के, अहमदनगर- 5.13 टक्के, औरंगाबाद – 7.25 टक्के, बीड – 6.72 टक्के, मावळ -5.38 टक्के, पुणे – 6.61 टक्के, रावेर – 7.14 टक्के , शिर्डी – 6.83 टक्के असे झाले आहे . या सर्व मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .