X : @vivekbhavsar
गेल्या आठवड्यात एक डॉक्टर भेटले. मूळचे परभणीचे, माळी समाजाचे. राज्यातील लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला आणि खंत व्यक्त केली. बालपणापासूनच तिघे मित्र, त्यातील दोघे मराठा समाजाचे. एकत्रच लहानाचे मोठे झालेले, घराच्या छतावर एकत्र बसून पार्टी करणारे, गप्पात एकमेकाची टिंगल करणारे हे मित्र. त्यातील एकाने व्हॉट्सअँप स्टेटस् ठेवलेलं. हा डॉक्टर त्याला सहज म्हणाला, काय देशमुख, आज एकदम भारी स्टेटस् ठेवले आहे, त्याने उत्तर दिले, भाऊ, जातीबद्दल कोणतीही मस्करी नाही. एका क्षणात वर्षांची मैत्री तुटली. कोणताही सुशिक्षित आणि डोके ताळ्यावर असलेल्या व्यक्तीला माळी समाजाच्या या डॉक्टरच्या वक्तव्यात मस्करी दिसणार नाही, पण गेल्या आठ – दहा महिन्यात मराठा समाजात अन्य मागासवर्ग अर्थात ओबीसी विरोधात किती टोकाचे विष पसरले आहे हे दिसून येते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथल्या वारकरी संप्रदायाने राज्याची समाजिक घडी पद्धतशीरपणे बांधून ठेवली आहे. नाही म्हणायला मराठा – दलित संघर्ष झाले, हिंदू – मुस्लिम संघर्ष झाले, पण त्यातून सगळा समाज ढवळून निघाला किंवा दोन समाजात टोकाचा संघर्ष झाला असे कधी झाले नाही. धूळ खाली बसली की संघर्ष झालेले समाज पुन्हा एकत्र आले. व्यापार – व्यवसाय करताना कधी असे झाले नाही की अमुकच एका समाजाकडून खरेदी करा, अमुक समाजाकडून काहीही खरेदी करू नका, असे फतवे कधी निघाले नाहीत. राजकीय बोलायचे झाल्यास ओबीसी समाजाच्या उमेदवाराला पाडा आणि समोर मराठा समाजाचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यालाच निवडून आणा, असेही छुपे फतवे कधी निघाले नाहीत.
दुर्दैवाने, राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोप – प्रत्यारोपामुळे राज्यातील या दोन समाजात कटुता निर्माण होते आहे. या कटुतेचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. ज्या ज्या मतदारसंघात ओबीसी विरूध्द मराठा अशी लढत झाली, तिथे ओबीसी समाजाच्या उमेदवाराला पराभूत करण्यात आले आणि जिथे मराठा विरूध्द मराठा अशी लढत होती तिथे भाजपच्या मराठा उमेदवाराला पराभूत करण्यात आले. संभाजीनगरात ओबीसी चंद्रकांत खैरे (शिवसेना – शिंदे) यांना पराभूत करण्यात येऊन मराठा समाजाचे संदीपान भुमरे (शिवसेना – ठाकरे) यांना निवडून आणले गेले. बीडमध्ये ओबीसी पंकजा मुंडे (भाजप) यांना मराठा बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार) यांनी पराभूत केले. नांदेडमध्ये मराठा समाजाचे प्रतापराव चिखलीकर (भाजप) यांना पराभूत करून काँग्रेसचे मराठा समाजाचे उमेदवार वसंतराव चव्हाण निवडून आले. परभणीत धनगर (ओबीसी) समाजाचे महादेव जानकर पराभूत झाले आणि मराठा समाजाचे संजय (बंडू) जाधव (शिवसेना – ठाकरे) निवडून आले.
यादी खूप मोठी आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला तर एक विशिष्ट पॅटर्न सगळीकडे राबविण्यात आल्याचे दिसून येते. एखादा समाज स्वतःहून टोकाचे असे काही निर्णय घेत नाही. त्यांना दिशा दिली जाते, आदेश, संदेश दिले जातात, सोप्या भाषेत बोलायचे झाले तर फतवे काढले जातात. असे आदेश दिले गेले असतील म्हणूनच पक्ष कुठलाही असो, मराठा उमेदवार निवडून आणले गेले. आणले गेले हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे. यामागे गेल्या काही महिन्यात ओबीसी विरोधात मराठा समाजाकडून जो टोकाचा विरोध मनामनात पेटवण्यात आला, तो कारणीभूत आहे. यामागे कोण आहे यांच्या खोलात मी जाणार नाही. एका समजाकडून टोकाची क्रिया केली जात असताना निसर्गाच्या नियमानुसार क्रियेला प्रतिक्रिया उमटत गेली, ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि यातून समाजा- समाजात दरी निर्माण होते आहे.
कोकण आणि पूर्व विदर्भात मराठा समाज नाही, तर तो आहे कुणबी. कुणबी समाज तसा सामाजिक वादापासून स्वतःला दूर ठेवतो. तरीही विदर्भातही काही प्रमाणात याचा फटका ओबीसी उमेदवाराला बसला. मराठा – ओबसी वाद वाढत असताना त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. त्यामागे त्यांचा राजकीय लाभाचा विचार असू शकतो. निवडणूक निकालात ते स्पष्टच दिसते आहे. पण त्यातून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत गेला आणि नंतर नंतर तर आता या दोन्ही नेत्यांच्या हातातून याचा कंट्रोल निघून गेला आहे.
राष्ट्रवादी हा मुळातच मराठा समाजाचा, सुभेदरांचा एक समूह आहे. या पक्षाला ठोस राजकीय भूमिका नाही. आता अजित पवार वेगळे झाले असले तरी त्यात फारसा फरक पडलेला नाही. या पक्षाच्या नेत्यांच्या नावावर नजर टाकली तरी लक्षात येईल की हे नेते त्यांच्या मतदारसंघात सुभेदारच आहेत, वर्षानुवर्षे तेच निवडून येणार याची जणू खात्रीच.
अंतरवली सराटी येथील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका, एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे जरांगे याच्यापुढे घातलेले लोटांगण, आरक्षण देऊनही जरांगे यांचा ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मंजूर करून घेऊ अशी भाषा यातून अस्वस्थ झालेला ओबीसी समाज जरांगे यांचाच मार्ग अवलंबून उपोषण करतो आहे आणि ओबीसी समाजाच्या या आक्रमक भूमिकेला सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांचा मिळत असलेला पाठिंबा हेच दर्शवते की यापुढे या दोन्ही समाजात संघर्ष वाढणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे नेते होण्याच्या नादात जरांगे यांना खूप जास्त ताकद दिली आणि तेच आता शिंदे यांच्यासाठी अडचणीचे ठरताना दिसत आहे. दोन समाजातील या दरीचा सर्वात जास्त फटका भाजपला बसला आहे. ओबीसी हा भाजपचा कट्टर पाठीराखा समाज होता. ‘ओबीसी हा भाजपचा DNA आहे’ हे देवेंद्र फडणवीस याचे वक्तव्य मराठा समाजाने अन्यत्र घेतले आणि भाजपला पराभूत करण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवले असे म्हटले तर वावगे होणार नाही.
उद्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने हीच भूमिका कायम ठेवली तर भाजपमधील असंख्य ओबीसी नेते पराभूत होण्याची भीती आहे. केवळ भाजप नव्हे तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे सारखे आक्रमक ओबीसी नेते, संजय शिरसाट, अतुल सावे यासारखे असंख्य नेते पराभूत होऊ शकतील. हेच लोन कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते ग्राम पंचायत पर्यंत पोहोचले तर घटनेने अधिकार दिलेल्या आदिवासी आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागा वगळता सर्व जागी केवळ आणि केवळ मराठा समाज निवडून येईल. ओबिसीचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. राज्याचे शासक आम्हीच ही भूमिका सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात मारक ठरेल.
ओबीसी म्हणजे केवळ माधव (माळी, धनगर, वंजारी) असा समज भाजपाने करून घेतला असेल तर ती मोठी चूक आहे. ओबीसी समाजात अल्पसंख्य असलेले शेकडो समाज/ जाती आहेत. त्यांनाही सोबत घेतले तर भाजपची ओबीसी व्होट बँक कायम राहील, अन्यथा हा समाज आज जसा भाजपसून दुरावला आहे, तसा कायमचा दुरावेल.
केवळ ओबसी समाजाला जवळ करून उपयोग नाही तर या राज्याची विस्कटलेली सामाजिक घडी रुळावर आणायची असेल तर मराठा समाजाला विश्वासात घ्यावे लागेल. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात सकल मराठा समाजाने अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धरित्या लाखोंचे मोर्चे काढले. मराठा समाजाने घालून दिलेल्या या आदर्शाचे ओबीसीसह सर्व समाजातील नेत्यांनी कौतुक केले होते. याचा अर्थ आजही या समाजात विचार करणारे, समाजात एकी राहावी यासाठी प्रयत्न करणारे नेते असतीलच, त्यांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा लागेल. जरांगे – पाटील आणि छगन भुजबळ यांच्या तोंडला लगाम लावावा लागेल, तरच या राज्यात पुन्हा रयतेचे राज्य येईल, केवळ सर्वसामान्यांचे सरकार, शेतकऱ्याचे राज्य हे बोलून नाही तर कृतीतून दाखवावे लागेल.
(लेखक विवेक भावसार हे राजकारण या मराठी न्यूज पोर्टल आणि TheNews21 या इंग्रजी न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. संपर्क 9930403073)