मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगत चाललेला दिसतोय. पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर सत्ताधारी भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसही मुस्लीमधार्जिणी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय. राम मंदिराला (Ram temple) काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीनं विरोध केल्याचं ते आता सभांमध्ये सांगतायेत. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर जनतेची संपत्ती घुसखोर आणि मुस्लिमांमध्ये वाटून टाकण्यात येईल, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सत्ताधाऱ्यांनी ध्रुवीकरणाची भूमिका घेतलेली असताना, दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू लागलेत. शेतकऱ्यांना हमी भाव देण्यास, पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं. हे अपयश ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न राज्यातही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) करताना दिसतायेत. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जुंपलीय
शरद पवारांनी विदर्भातील शेतकऱ्यांची माफी मागावी – अमित शाहा
शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते, त्यावेळी विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आतमहत्या केल्या. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पवारांनी माफी मागावी, असं वक्तव्य अमित शाह यांनी अमरावतीच्या सभेत केलंय. या शाह यांच्या टीकेचे जोरदार पडसाद राज्यात उमटले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय,
शाह यांनी १० वर्षांत काय केलं- पवार
अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी पुण्यात उत्तर दिलंय. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आज करण्यात आलं. त्यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, मोदी- शाह यांच्या सरकारच्या १० वर्षांच्या काळात त्यांनी काय केलं, असा सवाल विचारला आहे. गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ झालेली आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शाह यांनी कोणती पावलं उचलली असा प्रतिसवाल पवारांनी केलाय.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.