मुंबई- एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार आहेत. येत्या १५ दिवसांत नवी दिल्लीत जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. दुसरीकडं प्रदेश पातळीवर याबाबत चर्चा झालीये का, याबाबत त्यांनी मौन बाळगलंय. दुसरीकडे तुटक प्रवेश नको, असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलंय. तर विनोद तावडे यांनी फडणवीस यांना चितपट केल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्यानं नवा वाद निर्माण झालाय.
कधी होणार खडसेंचा पक्षप्रवेश?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपुरात तर योगी आदित्यनाथ वर्ध्यात प्रचारसभा घेणार आहेत. राज्यात महायुतीचा लोकसभेचा प्रचार या सभांपासून खऱ्या अर्थी सुरु होईल. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपाला गुड न्यूज मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार आहेत. चंद्रपूरच्या पंतप्रधानांच्या सभेत खडसे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र खडसेंनीच हा प्रवेश नवी दिल्लीत होणार असल्याचं स्पष्ट केलंय. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पुढच्या १५ दिवसांत भाजपात परतणार असल्याचं खडसे यांनी सांगितलयं.राज्यातील देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली का, याबाबत मात्र त्यांनी बोलण्याचं टाळलंय. संकटकाळात मदत करणाऱ्या शरद पवारांचे त्यांनी आभारही मानलेत. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा त्यांची भेट घेत भाजप मध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, असल्याचं खडसेंनी सांगितलंय. भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि येत्या १५ दिवसात भाजप मधे प्रवेश करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं खडसे म्हणालेत. भाजप प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांच्याशी काही चर्चा झाली आहे का?या प्रश्नावर मात्र खडसेंनी बोलणे टाळलेलं आहे.
रोहिणी खडसे मात्र शरद पवारांसोबतच
भाजपात घरवापसी करणार असं खडसे सांगत असले, तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार आहेत. रोहिणी खडसेंनी एक्स पोस्ट करत हे स्पष्ट केलेलं आहे.
काय आहे एक्स पोस्ट
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार
मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे.
मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच…
लढ़ेंगे और जीतेंगे
तुटक प्रवेश नकोत – बावनकुळे
या सगळ्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तूटक तूटक निर्णय होणार नाहीत, हे स्पष्ट केलंय. खडसेंच्या प्रवेशाबाबत केंद्रीय आणि राज्य समिती एकत्रित विचार करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील कुणाचाही पक्षप्रवेशाला विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
विनोद तावडेंनी फडणवीसांना चितपट केलं- अंधारे
तर खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं विनोद तावडेंनी फडणवीस यांना चितपट केलंय अशी एक्स पोस्ट सुषमा अंधारे यांनी केलीय.
काय म्हणाल्यात सुषमा अंधारे?
पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी
जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी,
एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट
फडणवीसांना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना
एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..
फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलंय..!
आताकधीचयेणारनाही
तावडे-फडणवीसांत नेमका काय वाद?
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केल्यानं याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय. २०१९ साली विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आल्यानंतर, दिल्लीत गेलेल्या विनोद तावडे यांनी गेल्या दोन तीन वर्षांत चांगली कामगिरी केलीय.
लोकसभा निवडणुकांत आणि बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी तावडेंकडे आल्यानंतर, त्यांचं पक्षातलं महत्त्व वाढल्याचं मानण्यात येतंय. मुंबईतून तावडे खासदारकी लढणार, अशीही चर्चा मधल्या काही काळात सुरु होती.दिल्लीत राज ठाकरे- अमित शाहा भेटीपूर्वी तावडेंनी राज यांची भेट घेतल्यानंही चर्चा रंगल्या होत्या. आताही खडसेंच्या पक्ष प्रवेशासाठी विनोद तावडे हेच आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय.आता खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं सुषमा अंधारेंनी केलेल्या ट्विटनं फडणवीस-तावडे संघर्षाच्या चर्चांना पुन्हा तोंड फोडलंय.
हेही वाचाःधाराशिवच्या जागेवरुन तणाव वाढला, शिंदे गट आक्रमक; आज वर्षा बंगल्यावर शक्तिप्रदर्शन