बीड- बीडच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणींची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना पदर पसरते, ही एक संधी आपल्याला द्या, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालंय. याचवेळी त्यांनी बोलताना खासदारकीच्या तिकीटाबाबत बोलताना एक मोठं विधान केलंय.
प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन – पंकजा मुंडे
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या दोन वेळा खासदार होत्या. प्रीतम मुंडे यांचं तिकीट घेऊन आपल्याला नको, अशी भमिका आधी पंकजा मुंडे यांनी घेतली होती. मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर त्यांनी बीडमधून खासदारकी लढवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर भाषणात बोलताना प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं सांगत पंकजा यांनी त्यांना नाशिकमधून उभं करीन असं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून भाषणात पंकजा सातत्यानं प्रीतम मुंडे यांचं योग्य पुनर्वसन करणार, असं सांगत आहेत. मात्र आता थेट त्यांनी मतदारसंघच सांगितल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
नाशिकच्या संभाव्य उमेदवारांचं टेन्शन वाढलं
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. छगन भुजबळ यांचं नाव या मतदारसंघआतून चर्चेत होते. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचाही पुन्हा उमेदवारीसाठी आग्रही भूमिका आहे. अशात उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाहीये. भुजबळ यांनी विलंब होत असल्यानं माघारीची भूमिका घेतलेली आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत नाशिकचं केलेलं विधान, हे नेमकं काय सूचित करणारं आहे. असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नाशिकमधून लोकसभा की विधानसभेला प्रीतम मुंडे यांना संधी मिळणार हे पंकजा यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळं नाशिकमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
हेही वाचाःजाहीर प्रचार संपल्यानंतर परभणीत रात्री ड्रामा, महायुतीचे उमेदवार जानकर यांची गाडी तपासण्यावरुन वाद