नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक
नागपूर : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, निवडणूक आयोगाने इतर राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना त्यातून महाराष्ट्राला वगळले. त्यामुळे राज्यात नेमकी निवडणूक कधी..? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
निवडणूक आयोगातील सूत्रांनी आता याबाबत माहिती दिलीय. महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ
26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. वेळेत निवडणूका घेणे, ही घटनात्मक सक्ती आहे. कारण वेळेत निवडणूक न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लावावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होईल असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले.
यापार्श्वभूमीवर काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी (पवार गट) यांनी आपले जागा वाटप निश्चित करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे सुमारे 80 टक्के जागा वाटप निश्चित झाले आहे. नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 31 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत महायुतीच्या 80 टक्के जागा निश्चित झाल्या आहेत.
याबाबत महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना 128 ते 133 जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा महायुतीच्या इतर घटक पक्षांसाठी सोडण्यात येणार आहे.
गेल्या 31 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली होती. यात जवळपास 80 टक्के जागा वाटप निश्चित झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.