X: @ajaaysaroj
मुंबई: नाशिक लोकसभा सीटवर छगन भुजबळ यांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीला देखील देण्यात याव्यात असा आग्रहही त्यांनी केला आहे. या मागणीनंतर, केवळ लोकसभेतच नाही तर इतर बाबतीतही राष्ट्रवादी पक्षाचा योग्य मान ठेवला जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी अजित पवारांना दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते भुजबळ यांना महायुतीचे राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेते म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
१ नोव्हेंबर १९९२ मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना भुजबळ यांनी केली. गेली जवळपास तीस वर्षे छगन भुजबळ व त्यांची समता परिषद कार्यरत आहे. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा व आंध्रप्रदेश याराज्यात परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्यांचे काम सुरू आहे. या प्रत्येक राज्यात भुजबळांनी विविध ठिकाणी मेळावे घेत तेथील ओबीसी वर्गाचे प्रश्न त्या – त्या सरकारसमोर मांडले आहेत.
स्थापनेनंतर लगेचच १९९३ मध्ये जालना येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी देशभरातून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात ओबीसींसाठी तातडीने मंडल आयोग लागू करण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेत ठराव पास करून घेतला. शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यानंतर महिन्याभरात संपूर्ण देशातून सर्वप्रथम महाराष्ट्रात मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला होता. या मेळाव्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा ठरावपण मांडण्यात आला होता हे विशेष. २०१० साली दिल्ली येथे घेण्यात आलेला आणि संपूर्ण देशभरात गाजलेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा राष्ट्रीय मेळावा तर न भूतो न भविष्यती असा झाला होता. गेल्या तीस वर्षांतील या सर्व आंदोलनांची व भुजबळ आणि समता परिषद यांची ताकद व कार्य महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेस आणून दिले असून भावी काळात छगन भुजबळ यांच्या ओबीसी बांधवांमध्ये असलेल्या स्थानाचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात महायुतीत करून घेण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे, असे समजते.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपला त्या तोडीचा ओबीसी नेता मिळलेला नाही, ही बाब राज्यातील आणि देशातील नेत्यांना मान्य करावीच लागेल. २०१४ पासून देशात सत्तेवर असूनही आजही भाजपकडे उच्चवर्णीयांचा, व्यापारी वर्गाचा पक्ष म्हणूनच बघितले जाते ही वस्तुस्थिती आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या संदर्भात भाजपचे, पर्यायाने महायुतीचे झुकते माप मराठा समाजाकडे असून ओबीसींवर अन्याय होत आहे असे चित्र आता राज्यात निर्माण झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी वर्गाची नाराजी भाजपाला परवडणारी नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील अगदीच नगण्य भूमिका महायुतीमध्ये मिळत आहे, अशी भावना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात असणेही योग्य नाही, त्यामुळे महायुतीच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवरील महायुतीचा ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचे घाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.