Twitter : @SantoshMasole
धुळे
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत आहेत, कोणाला गळ घालत आहेत, हे मला माहीत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे, असा गौप्यस्फोट धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मी हे हलकं फुलकं बोलत नसून अतिशय विश्वासाने बोलत असल्याची पुष्टीही ना. महाजन यांनी केली.
गणपती उत्सवानिमीत्ताने विविध गणेश मंडळांना भेटी देण्यासह आरती करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन रविवारी सायंकाळी धुळे येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची प्रतिक्रीया आ .एकनाथ खडसे यांनी दिली होती. याबाबत ना. महाजन यांना विचारले असता, त्यांनी माध्यमांसमोर गौप्यस्फोट केला. एकनाथ खडसे हे कोणाशीच एकनिष्ठ राहून शकत नाही. ते जरी म्हणत असले की, मी शरद पवारांशी एकनिष्ठ आहे तरी त्यात तथ्य नाही. कारण, ते अजित पवारांकडे पक्षात घेण्यासाठी आग्रह करत आहेत. तसेच ते आमच्या भारतीय जनता पार्टीमध्येही परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाजन म्हणाले, भाजपमध्ये परतण्यासाठी खडसे वरिष्ठ नेत्यांकडे गळ घालत आहेत. खडसेंनी अन्य पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनी सध्या ज्या पक्षात आहे, त्या ठिकाणीच सुखी रहावे, असा टोलाही ना. महाजन यांनी लगावला. हा नाराज, तो नाराज, असे बोलण्यापेक्षा खडसेंनी त्यांचे राजकीय भविष्य काय, ते बघावे. त्यांनी त्यांचा पक्ष बघावा. अजित पवार नाराज नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. यामुळे हिम्मत असेल तर खडसेंनी लोकसभेची उमेदवारी करुन निवडणुक लढवून दाखवावी, असे आवाहनही ना. महाजन यांनी खडसेंना दिले.
यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा नगरसेविका जयश्री अहिरराव, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, कमलाकर अहिरराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.