X: @ajaaysaroj
मुंबई: शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यातच राज ठाकरे यांचे इंजिन देखील या डब्यांना लागणार असून मनसेने ३ जागा मागितल्या आहेत अशी चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जागावाटपाचा चेंडू आता थेट दिल्लीच्या कोर्टातच नेण्याचा निर्णय युतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित शाह यांना भेटून आल्यानंतर राज्यातील महायुतीची सर्व समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षात लोकसभेच्या जागावाटपावरून खेचाखेची सुरू असतानाच मनसेच्या महायुतीमध्ये येण्याच्या शक्यतेने तीनही पक्षांना आपली गणित पुन्हा मांडावी लागत आहेत. प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे राजकीय पत्ते पुन्हा पिसावे लागले आहेत. राज ठाकरे यांची होऊ घातलेली एन्ट्री ही जेवढी महायुतीला फायदा करून देणारी ठरेल त्या पेक्षा कित्येकपट अधिक ती एकट्या शिवसेनेला “ब्रँड ठाकरे” म्हणून मजबुती देणारी, उभारी देणारी ठरणार आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज ठाकरे यांचे शिवसेने बरोबर असणे हे थेट, “माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला” या उबाठा गटाच्या रडगाण्याला चपराक देणारे ठरणार आहे. मात्र राज यांच्या महायुतीमध्ये येण्याच्या शक्यतेने जागावाटपाची गणित बदललेली आहेत हे निश्चित.
दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीन जागा मनसेने मागितल्या आहेत, अशा चर्चा काही दिवस माध्यमातून सुरू आहेत. यातील किती व कुठल्या जागा मनसेला सोडायच्या, आणि त्या कोणाच्या कोट्यातून द्यायच्या यावर घोडं अडलेले आहे. त्याचप्रमाणे अमरावती, माढा, ठाणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर व सातारा या जागांची रस्सीखेचदेखील महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांमध्ये सुरू आहे. गेले दोन दिवस उदयनराजे भोसले हे दिल्लीत साताराच्या जागेसाठी तळ ठोकून बसले आहेत. थेट भोसले राजघराण्यातील उदयनराजेंना केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी ताटकळत राहावे लागत आहे, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. उदयनराजे यांना भाजपातून कमळ या निशाणीवरच निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी आता त्यांना थेट दिल्लीला धाव घ्यावी लागली आहे.
रत्नागिरी मतदारसंघात देखील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे, त्याचा निर्णय देखील अजून झालेला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर ही जागा देखील आम्हाला द्यावी, इथून धनुष्य- बाण निशाणीवर उमेदवार लढला तर महायुतीला त्याचा फायदा होऊन या दोन्ही सीट महायुतीच्याच पारड्यात पडतील, अशी ग्वाही शिवसेना नेते देत आहेत.
छत्रपती संभाजी नगरात उबाठाच्या मशाल निशाणी समोर शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी हिंदुत्ववादी मतांची बेगमी जास्त चांगल्या प्रकारे करेल, अशी थेअरी शिवसेनेने भाजपसमोर मांडली आहे. नाशिकची जागा मनसेने मागितली आहे, अशी चर्चा माध्यमात सुरू असतानाच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या मतदारसंघात आपला दावा ठोकला आहे. अमरावतीची जागा शिवसेनेचे अडसूळ पिता – पुत्र मागत आहेत, येथील विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी पाच वर्षे दिल्लीत भाजपचा किल्ला लढवला होता तर राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून थेट उद्धव ठाकरे यांनाच निशाण्यावर घेतले होते. या इथून कमळ निशाणीवर भाजपचा उमेदवारच लढेल असे थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच सांगितल्याने, नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता असून, शिवसेनेला इथे पाणी सोडावे लागणार अशी चिन्ह आहेत. माढा मतदारसंघातदेखील तालेवार घराण्यांचे राजकारण सांभाळताना भाजपला कसरत करावी लागत आहे.
या सर्व जागांचा तिढा लवकर सुटावा यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार आज किंवा उद्या दिल्ली दरबारी जातील असे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल, त्याआधी सर्वच उमेदवारांची घोषणा नाही तरी किमान जागावाटप पूर्ण करावे अशी अपेक्षा सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.