पुणे – महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत चर्चा होणं बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. वंचितला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वंचित मविआसोबत यावी, यासाठी शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न करताना दिसतायेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी दोन ते तीन वेळा दूरध्वनीवर चर्चा केली आहे. गेल्या मविआच्या बैठकीत आंबेडकरांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत स्वत: शरद पवार उपस्थित होते. मात्र त्या बैठकीतही तोडगा निघू शकलेला नाही. निवडणुकांनंतर भाजपासोबत जाणार नाही, हे मविआतील पक्षांनी बॉन्ड पेपरवर लिहून द्यावे अशी मागणी आंबेडकरांनी केलेली आहे. मात्र याबाबत मविआतील घटक पक्ष निर्णय घेत नसल्याचा आंबेडकरांचा आक्षेप आहे.
आंबेडकरांच्या हेतूबाबत आत्ताच शंका घेत नाही- पवार
आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांच्या हेतूबाबत आत्ताच शंका उपस्थित करणार नाही, असं सूचक विधानही शरद पवार यांनी केलंय. शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकरांचा विश्वास नसल्याचं दिसतंय. काँग्रेस सातत्यानं निजामी मराठ्यांच्या मानसिकतेत असल्याची टीका आंबेडकर करतायेत. तर शरद पवार हे आतून भाजपासोबत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. जिंतेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या खुल्या पत्राला उत्तर देतानाही, पवार हे भाजपासोबत जाणार नाहीत, याची खात्री नसल्याचं आंबेडकर म्हणालेले आहेत. या सगळ्यात शरद पवार यांनीही आंबेडकरांच्या हेतूबाबत आत्ताच शंका घेत नाही, असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडल्याचं मानण्यात येतंय.
रोहित पवारांच्या अटकेविषयीही पवारांचं भाष्य
ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचं शरद पवारांनी या पत्रकारा परिषदेत सांगितलं. कर्नाटकात डी के शिवकुमार यांच्या बाबतीत हेच पहायला मिळालं. कर्नाटकातील दोन नंबरच्या मंत्र्याला अटक करण्यात आली होती, असं पवार म्हणालेत. राज्यातही हेच सुरु असल्याचं सांगत, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली, असंही पवार म्हणालेत. रोहित पवारांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. हे अनाकलनीय असल्याचं पवार म्हणमालेत. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले, रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला. तरीही ही कारवाई करण्यात येतेय, याबाबत पवारांनी आक्षेप घेतलाय. रोहित पवारांना अटक होईल का, या प्रस्नावर याबाबत भरवसा देता येणार नाही, असं पवार म्हणालेत. कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अशीच अटक करण्यात आली होती. असंही पवारांनी सांगितलंय. रवींद्र वायकरांच्या बाबतीतही असंच झाल्याचं दिसतंय असं सांगत, वायकरांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर त्यांनी प्रश्न निर्माण केलेत.
ईडीचा उपयोग दहशतीसाठी- पवार
ईडीच्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत हे तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय. ईडीनं कारवाई केलेल्यांपैकी एकही व्यक्ती भाजपचा नाही, सगळेच विरोधी पक्षातील आहेत, हे कसे असा सवालही पवारांनी विचारलाय. 2004 ते 2014 या कॉंग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडीच्या 26 कारवाया झाल्या, त्यातले 4 नेते कॉंग्रेसचे होते तर तीन नेते भाजपचे होते. ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यात होतोय, असंही पवार म्हणालेत.