मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आजचा दिवस महत्त्वाचा मानण्यात येतोय. लोकसभा निवडमुका जाहीर होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरी अद्यापही जागावाटपचा तिढा सुटलेला नाहीये. आज याबाबत महायुती आणि मविआत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.
मविआच्या बैठकात जागावाटपाचं फायनल होणार
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील १८ ते १९ जागांवर चर्चा झालीय. १२ नावही निश्चित करण्यात आलीत. उरलेल्या जागांवर आजच्या मविआच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सिल्व्हर ओकवर होणाऱ्या बैठकीत मविआ जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हं ाहेत. मुंबईतील तीन जागा, सांगली, भिवंडी यासारख्या जागांवर तिढा असल्याचं मानण्यात येतंय. आजच्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ठाकरे गट २० जागा, काँग्रेस १८ जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढण्याची शक्यता आहे. या बैठकीला वंचितला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळं वंचित स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार का हे पाहावं लागणार आहे. राजू शेट्टींना मविआनं पाठिंबा जाहीर केल्यास त्यांना कुणाकडून पाठिंबा जाहीर होणार हेही पाहावं लागणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची वरळीत बैठक
शिंदेंच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत शिंदेंचे खासदारकीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. १३ खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला कोणत्या जागा मिळतात हे पाहावं लागमार आहे. दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, परभणी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, अमरावती या मतदारसंघात नेमकं कोणाचा उमेदवार लढणार, हे आजच्या शिंदेंच्या सेनेच्या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंची मनसे नेत्यांबरोबर बैठक
राज ठाकरे अमित शाहा यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मनसेनं मागितलेली आहे. त्यातील दक्षिण मुंबई जागा सोडण्यास भाजपानं नकार दिल्याचं सांगण्यात येतंय. अशा स्थितीत महायुतीत राहणार की मैत्रीपूर्ण लढत देऊन ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात काही ठिकाणी मनसे उमेदवार देणार, हे पाहावं लागणार आहे. विधानसभेसाठी मनसेला महायुतीत मोठा वाटा मिळेल असंही सांगण्यात येतंय. याची स्पष्टता आजच्या मनसेच्या बैठकीनंतर येण्याची शक्यता आहे.
फडणवीस-अजित पवार मुंबईत
तर विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज भेट होण्याची शक्यता आहे. शिवतारे यांनी महायुतीच्या नेत्यांचं ऐनलं नाही, तर काय करायचं याचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यासह अजित पवार नेमक्या किती जागांवर लढणार याची फायनल बोलणीही आज दिवसभरात होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय.