X : @therajkaran
मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) मतदानातून जनतेने महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बाजूने कौल दिला याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आज येथे एकत्र पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या जनतेप्रती आभार व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत (State Assembly election) याहीपेक्षा अधिक एकसंघपणे लढवून राज्यात मविआ सत्तेत आणण्याचा निर्धार प्रकट केला.
कॉंग्रेसनेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात (BJP) सडकून टीका केली. आपण अजिंक्य, आपल्याविरोधात कोणी लढू शकत नाही हा त्यांचा समज जनतेने फोल ठरवला, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर पंतप्रधानांनी राज्यात अनेक सभा घेतल्या, रोड शो केले तरी जनतेने आम्हाला पाठिंबा दिला याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला जाहीर धन्यवाद दिले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्हाला चौकशी करणाऱ्या संस्थांचा दुरूपयोग करणाऱ्या फार मोठ्या शक्तीविरुद्ध लढावे लागले. धार्मिक ध्रुवीकरणाला यश लाभलं नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. शेतकरी बांधवांना गृहित धरु नका, हा संदेश या निवडणुकीने दिला. सर्व समविचारी छोटे पक्ष, संघटना यांचे बुथस्तरावरील कार्यकर्ते यांत उत्तम समन्वय होता. आगामी विधानसभा निवडणुकही त्याच ताकदीने लढू, असा निर्धार चव्हाण यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रातील सरकारची कडबोळे अशी खिल्ली उडवित ते किती काळ राहील याबाबत शंका व्यक्त केली. मोदी यांच्या विरोधात हे मतदान झाले, लोकशाही वाचविण्यासाठी सर्वधर्मिय एक झाले. मुंबई ही मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवली आहे. मुंबई लुटणाऱ्यांना विस्तवाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
शरद पवार यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले, सत्तेचा गैरवापर होत आहे. अनेक लोक कारण नसताना तुरुंगात आहेत. लोकांनी याविरोधात भुमिका घेतली. यातूनही शहाणपण आले नाही तर चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत लोक उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला. तर आमचा गुजरातवर राग नाही. मोदी-शहा यांनी गुजरात व देश यांमध्ये भिंत उभी करू नये असे एका प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी सांगितले.
आमच्या सोबत आणखी काही पक्ष आले तर घेऊ, पण आहेत त्यांना घेऊनच पुढे जाऊ. मात्र सोडून गेले त्यांना परत घेणार नाही. भाजपने आधी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाला दिले.