Twitter : @therajkaran
नागपूर
भाजपातर्फे गांधी जयंती, २ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागर यात्रा आयोजित करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि भाजपा प्रवक्ते, माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी नागपुरात दिली.
या यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री भागवतराव कऱ्हाड, महाराष्ट्रातील इतर मंत्री, खासदार आणि आमदार मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील सर्व ११ जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.
यात्रेची सुरुवात वर्धापासून होत असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. या ओबीसी जागर यात्रेची माहिती सर्व जनतेला व्हावी आणि जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. आशिषराव देशमुख यांनी केले आहे.
पत्रपरिषदेला भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते उपस्थित होते. त्यांनी यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी घोषित केली.