मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे (Bajrang Manohar Sonwane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवर आता भाजपकडून रिंगणात असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . संपूर्ण निवडणुकीच्या काळात मी विरोधकांच्यावर काही बोलणार नाही ,त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करणार असं म्हणत त्यांनी सोनवणे यांच्यावर थेट बोलणं टाळलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या , नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर माझी निवडणुकीची तयारी नसते तर पाचही वर्ष मी निवडणुकीसाठी तयारी करत असते. ज्या पद्धतीचा संपर्क, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणार आहे ते करत असते. प्रीतम ताई सुद्धा फिरत आहे, काम करत आहोत. ‘ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता आमचे मित्र पक्ष देखील काम करत आहेत. फक्त हे निमित्त आहे उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं. जसं त्यांना ( सोनावणे) वाटतं, तसं मलाही वाटतं.त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं मी माझं काम करते असे त्यांनी सांगितले .समोरचा उमेदवार कोणताही असो, निवडणूक तेवढ्याच गांभीर्याने घेतली पाहिजे असं मी समजते. ही निवडणूक विकासावरच जावी असं मला वाटतं, कारण जिल्ह्याच्या इतिहासात ही संधी बीडला आली आहे, असं पंकजा मुडे यांनी सोनवणे यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी ज्योती मेटे (Jyoti Mete) या देखील इच्छूक होत्या. मात्र ऐनवेळी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता ज्योती मेटे या बीडमधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीनं त्यांना दिलेला तो अधिकार आहे, त्यांची भूमिका राज्यभर वेगळी जाण्याची आहे का? की फक्त बीज जिल्ह्यापूर्ती मर्यादीत आहे? त्यांनी तशी भूमिका का घेतली हे त्यांना जनतेला पटवून द्यावं लागेल असे त्यांनी म्हटलं आहे