ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद पवार बीडमध्ये मोठा डाव टाकू शकतात. त्यामुळे एकहाती वाटणारी बीड लोकसभा राज्यात गाजेल.

दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या पंकजा मुंडेविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहेत. त्या शरद पवार गटात सामील होणार आहेत. यामुळे ही लढत पंकजा मुंडेंसाठी सोपी असणार नाही.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना भाजपला बीडमधून ओबीसी उमेदवार देणं किती परवडेल हा मोठा मुद्दा आहे. २०१४ विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाखाली पंकजा मुंडे निवडून आल्या. मात्र त्यानंतर त्यांना आपली जागा सांभाळून ठेवता आली नाही. २०१९ मध्ये त्यांना मोठा परभव पत्करावा लागला. या निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू व राज्यातील मंत्री धनंजय मुंडे विजयी झाले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे हा प्रवास दिसतो तितका सोपा असणार नाही.

काही स्थानिक वृत्तपत्रांनुसार, जर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात मविआमधून ज्योती मेटे उभ्या राहिल्या तर याचा मविआला चांगला फायदा होऊ शकता. बीडमधील जातनिहात मतदारांची संख्या पाहिली तर येथे एकूण मतदार २१ लाखांच्या घरात आहेत. यातील मराठा मतदार – ७.५, ओबीसी मतदार – ६ लाख, मुस्लीम मतदार – ३.५ लाख, दलित मतदार – २ लाख आणि इतर २ लाखांपर्यंत आहे. सध्या देशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठ्यांमध्ये भाजप आणि ओबीसी विरोधात वातावरण असल्याचं दिसतयं. अशा परिस्थितीत ज्योती मेटे यांना मराठा, दलित, मुस्लीम यांची मतं जरी मिळाली तरी हा आकडा तब्बल १३ लाखांच्या जवळपास जातो. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना ओबीसी आणि इतर मतदान मिळालं तरी हा आकडा ८ लाखांच्या जवळपास पोहोचतो. हा अंदाज काही स्थानिक वृत्तपत्रांनी वर्तवला आहे. यातील मतदान कमी-जास्त जरी झालं तर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांमुळे मतांचं विभाजन होईल, याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे बीडमधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं असलं तरी पंकजा मुंडेंसाठी ‘दिल्ली अभी दूर है’, असंच म्हणावं लागेल.

बीड लोकसभा मतदारसंघांमधून शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांच्यासह बजरंग सोनवणे इच्छुक आहेत. सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांना बीडमध्ये तगडा झटका बसला आहे. दुसरीकडे शिंदे गटातील माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून समोर येण्याची चर्चा आहे. त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात