महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणीसुरक्षेसाठी ४,०७७ कोटींचा ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्प; मनोरीत समुद्राच्या पाण्यापासून मिळणार गोडे पाणी

विधानसभेत मुंबईच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाबाबत माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत.

२०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; ४८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पश्चिम उपनगरातील मालाड येथील मनोरी येथे ४,०७७ कोटी रुपयांचा २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेचा समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण (Desalination) प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली.

मुंबईला सध्या सात धरणांमधून दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहराची दैनंदिन गरज ४,६६५ दशलक्ष लिटर इतकी वाढल्याने सुमारे ५६५ दशलक्ष लिटरची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविणारा मनोरी येथील डिसॅलिनेशन प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मंत्री सामंत यांनी सांगितले की, या प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुऱ्या प्राप्त झाल्या असून, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.

प्रकल्पाची उभारणी जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड आणि आय.डी.ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीत करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम ४८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर २० वर्षे परिचालन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे राहणार आहे.

सरकारच्या माहितीनुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने १,००० लिटर पाण्यामागे सुमारे ३५ रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी हा पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

मुंबईची वाढती लोकसंख्या, हवामान बदलाचे परिणाम आणि पारंपरिक जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता, समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण हा शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षा आराखड्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण झाल्यास आगामी काळात मुंबईच्या पाणीपुरवठ्याला अतिरिक्त आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात