X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वर्ध्यातुन (Wardha Lok Sabha) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पुन्हा एकदा संधी देत लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तडस एकेकाळी पैलवान होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) नेमके कुणाला रिंगणात उतरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा सांगणारा हा वर्धा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात तेली विरुद्ध कुणबी असा सर्वसाधारण सामना ठरलेला असतो. वर्धा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसचा (Congress) गड मानला गेला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने १९९१ मध्ये हा गड भेदला. नंतर भाजप, काँग्रेस, भाजप असा कौल मतदारांकडून मिळत गेला. गेल्या तीन निवडणुकांचा विचार करता २००९ मध्ये दत्ता मेघे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ३ लाख ५२ हजार ८५३ मते घेऊन विजय मिळविला. भाजपच्या सुरेश वाघमारे यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. भाजपने उमेदवार बदलून रामदास तडस यांना संधी दिली. तडस यांनी ५ लाख ३७ हजार ५१८ मते घेऊन विजय मिळविला. २०१९ मध्ये तडस यांना बदलून भाजप नव्या उमेदवारांवर डाव लावणार असे चित्र होते. तडस यांच्यासाठी तेली समाज एकवटल्याने शेवटी पक्षाला तडस यांनाच उमेदवारी द्यावी लागली. या निवडणुकीत तडस यांनी ५ लाख ७८ हजार ३६४ मते घेऊन विजय मिळविला. काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांचा पराभव केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यांतील सहा विधानसभा (Vidhan Sabha) मतदारसंघांमध्ये विस्तारलेला आहे. यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा असे चार, तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. धामणगाव, आर्वी, हिंगणघाट, वर्ध्यात भाजप; देवळीमध्ये काँग्रेस तर मोर्शीत अपक्ष आमदार आहे. मोर्शीचे आमदार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे समर्थक आहेत. परिणामी महायुतीच्या आमदारांची संख्या पाच इतकी होते. आता या मतदारसंघात पैलवान विरुद्ध कोण रिंगणात येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.