Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांचीच होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. मात्र आम्हाला तीन पक्षाचे सरकार नको आहे. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election results) कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने गोंधळाची परिस्थिती होती. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपकडून मान्य न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीशी (NCP) बोलणी सुरु केली होती. परिणामी भाजपला (BJP) सत्ता स्थापनेचा दावा करता येत नव्हता. कोणत्याही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा होत नसल्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मान्यही केली होती. मात्र, भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर काही दिवसात अजित पवार (Ajit Pawar) माघारी फिरले. राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी शरद पवार यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा होती.
मात्र, फडणवीस यांनी आज शरद पवारांमुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा दावा केला. राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिले जाते. त्यांना तसे पत्र दिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसलाही पत्र देण्यात आले होते. त्यावेळी आम्ही सरकार बनवणार नाही, असे राष्ट्रवादीचे पत्र माझ्या घरी टाईप केले होते. शरद पवार यांनी या पत्रात दुरुस्तीही केली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर टाकण्यात आली. आम्ही मंत्र्यांच्या खात्यांची यादी तयार केली. जिल्ह्यापासूनच्या सर्व गोष्टीही ठरवल्या. या प्रक्रियेच्या काळातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचेही ठरले. त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली. पण त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला. हे योग्य नसल्याचे अजित पवार यांना वाटले. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला होता, असाही दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
दरम्यान, राज्यात आजच्या घडीला भाजप पहिल्या क्रमांकावर असून पुढेही पहिल्या नंबरवरच राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तूर्त दिल्लीला न जाता मी राज्यातच काम करणार असल्याचे आणि राज्यात सरकार आणणार असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.