मुंबई- राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट मुंबईत पाहायला मिळाली. काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते शिवाजी पार्कवरच्या सभेत उपस्थित होते. मात्र या सगळ्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीकडं सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चांत वंचित नाराज आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतो आहे. वंचितला ४ जागा सोडणार असल्याचं मविआचे नेते सांगतायेत, मात्र हा फॉर्म्युला वंचितला अमान्य असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं इंडिया आघाडीच्या सभेला वंचित उपस्थित राहणार का, असा सवाल होता. मात्र आंबेडकरांची सभेतील उपस्थिती मविआसाठी आशादायी म्हणायला हवी
मविआचं जागावाटप निश्चित?
राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेच्या निमित्तानं पक्षाचे ज्येष्ठ नेते मुंबईत होते. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी मविआ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांच्या घरीही एक बैठक पार पडली. या बैठकांमध्ये वंचितसह आणि वंचितशिवाय अ्से दोन जागावाटपांचे फॉर्म्युले ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
कोणते आहेत दोन फॉर्म्युले?
मविआच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत दोन फॉर्म्युले निश्चित केल्याचं सांगण्यात येतंय.
१. पहिला फॉर्म्युला वंचितविना
ठाकरे शिवसेना- 22
काँग्रेस-16
शरद पवार राष्ट्रवादी -10
- दुसरा फॉर्म्युला वंचितसह
ठाकरे शिवसेना- 20
काँग्रेस-15
शरद पवार राष्ट्रवादी- 09
वंचित बहुजन आघाडी-04
हे दोन्ही फॉर्म्युले निश्चित केल्याचं सांगण्यात येतंय. येत्या एक ते दोन दिवसांत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक तारखा जाहीर झाल्यानं निर्णय
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर जागावाटप आणि उमेदवार जाहीर झाले तर प्रचार सुरु करता येणार आहे. भाजपानं आघाडी घेत राज्यातील 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळं मविआकडूनही लवकरात लवकर नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः‘अजित पवारांसारखा नालायक माणूस नाही’, अजित पवारांचे सख्खे बंधू मैदानात, बारामतीत केली सडकून टीका