मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा २०१९ पासूनचा सुरु असलेला राजकीय वनवास अखेर संपला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना खासदारकीचं तिकिट मात्र नाकारण्यात आल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास त्यांची पुढची कारकिर्द आता दिल्लीत दिसण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांचा वनवास संपला
२१०९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. या पराभवासाठी भाजपातील काही धुरिणांचा पाठिंबा असल्याचा आरोप प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यानंतर सातत्यानं पंकजा मुंडे आणि स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला. २०१९ विधानसभा निवडमुकीनंतर विधान परिषद, राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र त्यात प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांना कोणतीही उमेदवारी देण्यात आली नव्हती.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना संघटनेत राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मध्य प्रदेश निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे या निर्णय प्रक्रियेत असल्याचं दिसलं नाही.
राज्यात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं मात्र त्यातही क्षमता असूनही पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. अजित पवार महायुतीत दाखल होईपर्यंत कॅबिनेटचा कारभार एकाही महिला मंत्र्याविना सुरु होता. यावरुन सरकारवर टीकाही झाली. मात्र तरीही पंकजा यांना संधी देण्यात आली नाही.
गेल्या वर्षभरापासून पंकजाताईंचे सूर तीव्र
सुमारे वर्षभरापासून पंकजा मुंडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात आपण पक्षाचे असलो, तरी पक्ष आपला नाही, असं पंकजा म्हणाल्या होत्या. याच कार्यक्रमात रासपच्या महादेव जानकर यांनी पंकजांनी आपल्या पक्षात येऊन निवडणूक लढवावी, असं आमंत्रण त्यांना दिलं होतं. त्यानंतर गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमात झालेल्या अन्यायाला वाचा फोडत या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही काही घडलं नाही. याच काळात पंकजा मुंडे यांनी स्वबळाची चाचपणी करण्यासाठी राज्यभरात शिवशक्ती यात्रेच्या निमित्तानं राज्यात टेम्पल रन केल्याचंही पाहायला मिळालं.
बीडच्या शासन आपल्या दारीनंतर सूर बदलले
अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे हेही मंत्रिमंडळात आले. त्यामुळं आता पंकजा यांचं पुढं काय होणार, विधानसभा मतदारसंघही असुरक्षित झाल्याचं सांगण्यात येत होतं. यातच बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर दिसले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं फडणवीस-पंकजा मुंडे यांच्यातील कटुता कमी झाल्याचं मानण्यात येतंय. मुंडे भावा-बहिणीनं बीडच्या विकासासाठी एकत्र काम करावं, असा सल्ला या कार्यक्रमात फडणवीस यांनी दिला होता.
संभाजीनगरच्या शाहांच्या सभेनंतर संकेत
या सगळ्यात बीडमधून पंकजांना लोकसभेची उमेदवारी मिळणार, याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र प्रीतम मुंडेंची जागा आपल्याला नको, असा सूर पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आळवला होता. काही दिवसांपूर्वी अमित शाहा यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात शाहा आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी या दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर पंकजा मुंडेंच्या तोंडी वनवास संपत असल्याचे संकेत दिसू लागले. बीडमध्ये झालेल्या दोन कार्यक्रमांत नेते, कार्यकर्त्यांनी आपल्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन करताना त्या दिसल्या. अखेरीस भाजपाच्या दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
दिल्लीत राजकारण, राज्यात काय?
पंकजा मुंडे यांना तिकिट मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांत आनंद असला, तरी आता त्या परत राज्याच्या राजकारणात परततील का, अशी शंका विचारण्यात येतेय. पंकजा मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते. राज्यातील भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचं नाव अग्रक्रमावर होतं. मात्र आता त्यांना खासदारकीचं तिकीट दिल्यानं त्यांना पुन्हा राज्यात संधी मिळेल का, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारण्यात येतोय. पंकजांचा राजकीय वनवास संपला असली तरी त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार की भविष्यात त्यांना पुन्हा राज्यात संधी मिळणार, हे पाहावं लागणार आहे.