मुंबई – लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता काही भागात प्रचारसही सुरु झालेला आहे. अशात निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा रंगू लागलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत गेल्या काही निवडणुकांपेक्षा जास्त खर्च केला जाईल असंही छातीठोकपणे सांगण्यात येतंय. राज्यात बदललेली राजकीय समीकरणं, महायुती विरुद्ध मविआ संघर्ष यामुळं उमेदवारांच्या मनात धाकधूक असल्याचं सांगण्यात येतंय. दोन्ही बाजूंची प्रत्यक्ष ताकद किती आहे हे माहिती नसल्यानं, निवडणुका चुरशीनं लढल्या जाणार आहेत. त्यात पैशांचा वापरही जास्त प्रमाणात होईल असं सांगण्यात येतंय. यातच केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रत्येक उमेदवार किती खर्च करु शकतो, याची माहिती दिलेली आहे.
प्रत्येक उमेदवाराला किती खर्चाची मर्यादा?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारासाठी 75 ते 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित केलेली आहे. यासह कार्यकर्त्यांवर करण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादाही निश्चित करण्यात आलीय. कार्यकर्त्यांच्या जेवणावर, चहा, कॉफीवर प्रत्येकी किती खर्च करावा, याचे दरही जाहीर करण्यात आलेत. निश्चित केलेल्या दरापेक्षा उमेदवारांनी हिशोबात अधिक खर्च दाखविल्यास आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला 95 लाखांची मर्यादा
महाराष्ट्रासह मोठ्या राज्यात प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, गोवा, अंदमान – निकोबार, चंदीगढ, दादरा नगर हवेली, लक्षद्विप, पॉंडेचरी आणि लडाख या राज्यात उमेदवारास ७५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलीय.
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा खर्चाचे दर 12 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांवर खर्चाची किती मर्यादा?
भौगौलिक परिस्थितीनुसार, ढोबळपणे प्रचारात किती खर्च करावा याचीसाधारण रुपरेषा ठरवण्यात आलेली आहे.
- शाकाहारी जेवण- 112 रुपये
- मांसाहारी जेवणासाठी- 224 रुपये
- चहा- 7. 84 रु.
- कॉफी – 13.44 रु.
- लस्सी – 22.44 रु.
- कोल्डिंक्स- 22.40 रु.
- नाश्ता- 28 रु.
प्रचार वाहनांच्या दरात किती खर्चाला मान्यता?
ट्रकचं भाडं – दिवसाला 5600 रुपये
चार चाकी गाडी- दिवसाला 2,800 रुपये
दुचाकी – दिवसाला 201,60 रुपये
सायकल- दिवसाला 67.20 रुपये
ढोलताशे- दिवसाला 2688 रुपये
हिशोब देणं बंधनकारक
सर्वपक्षीय प्रतिनिधींसोबत चर्चा करून हे दर ठरवण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपल्या खर्चाचा दररोजचा हिशोब ठेवणं बंधनकारक आहे. या खर्चावर निवडणूक आयोगाकडूनही लक्ष ठेवण्यात येतं. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर करणं, बंधनकारक असतं.