X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्प्याचे मतदान 17 एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाही शिल्लक राहिलेला नाही. परंतु, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता महायुतीतील (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीतून सोडवला जाणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत महायुतीची बैठक पार पडणार आहे. यासाठी महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (Ajit Pawar Group) अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेते हे दिल्लीला जाणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांबाबत अद्यापही तिढा कायम आहे. ज्यामुळे याबाबत आता थेट दिल्लीत चर्चा करण्यात येणार आहे. अमित शहा जागा वाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करून हा तिढा सोडवणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे 48 पैकी 20 लोकसभा मतदारसंघात भाजपा (BJP) उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उरलेल्या 28 जागांबाबत कसा निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, 28 पैकी महायुतीत 12 लोकसभा मतदारसंघाबाबतचा कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे या 12 जागांचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी दिल्लीत महायुतीची बैठक बोलावली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.