Twitter : @vivekbhavsar
मुंबई
भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत.
विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे भाजपला जवळपास 13 जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्या कॅम्पमधले म्हणून ओळखले जातात. भाजपने झालेली चूक दुरुस्त करताना बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले, तेव्हा भाजपपासून दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा पक्षाकडे वळवता येईल, असा वरिष्ठांचा कयास होता. मात्र सुरुवातीपासूनच बावनकुळे हे त्यांच्या वाचाळपणामुळे अनेकदा अडचणीत आले आहेत.
भाजप नेत्यांनी यापूर्वी ‘चाय बिस्कुटवाले पत्रकार’ अशी जाहीर टीका केली होती. त्यावेळी भाजपमधील ‘दुय्यम’ फळीतील नेते आघाडीवर होते. आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच पत्रकारांना ‘चहासाठी बोलवा, ढाब्यावर न्या आणि 2024 च्या निवडणुकीपर्यंत आपल्या विरोधात बातमी लागणार नाही याची काळजी घ्या.’ असा सल्लाच नगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
या संदर्भातील क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आणि स्थानिक वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, मनसे पदाधिकारी नीलेश भोसले यांनी बावनकुळेंवर टीकेची झोड उठवली आहे.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने बावनकुळे यांचा निषेध करतानाच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
बावनकुळे यांच्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण भाजपा बॅकफुटवर गेली. तरीही त्यांच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ पुढे सरसावल्या. बावनकुळे व्यंगात्मक बोलले, असा दावा करून चित्रा वाघ विरोधकांवरच घसरल्या. दरम्यान, दिवसभरामध्ये बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नव्हती.