मुंबई- भाजपाशी असलेल्या संबंधांवरुन काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जुंपल्याचं दिसतंय. नाना पटोले यांचे भाजपाशी संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता काँग्रेसनं पलटवार केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही भाजपाला अनुकूल असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केलेला आहे. जागावाटपाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत वंचितनं आघाडीत यावी यासाठी तिन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सन्मानजनक वागणूक दिली नाही असं सांगत आंबेडकरांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित ७ जागी बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र खर्गे यांनी या पत्राला उत्तर दिलेलं नाही. अशात त्यांनी नाना पटोले यांच्यवरही आरोप केले होते.
वंचितची भूमिका भाजपाधार्जिणी- मुणगेकर
लोकसभेची ही निवडणूक अत्यंत निर्णयाक अशी आहे. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं भूमिका घेणं अपेक्षित होतं. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घएतली, असा आरोपही मुणगेकर यांनी केलाय.
वंचितबाबत अजूनही खुली भूमिका – पटोले
प्रकाश आंबेडकर यांनी अपमान केला असला तरी देशाची घटना, लोकशाही महत्त्वाची आहे. त्यामुळं आंबेडकरांनी अजूनही सोबत यावं अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीला जाण्याची गरज नाही, त्यांनी आजही बोलणी करुन सोबत यावं, असंही पटोले म्हणाले आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार जिंकेल अशी स्थिती असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.